मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

माझा हात डीसलोकेट होतो त्याची गोष्ट !!!

गोष्ट तशी फार साधी आहे ...माझा हात ह्या शनिवारी डाव्या खांद्यातून निखळला ...म्हणजे तो काही पहिल्यांदाच नाही निखळला या अगोदर हि त्याने आपले स्थान ३ वेळा सोडले होते, हि चौथी वेळ , त्याचं अस झालं 

दिवस पावसाचे होते ...वेळ संध्याकाळची ती हि कोकणात ....गौरी गणपतीचे दिवस होते. आमच्या इथे सगळ्यात प्रथम आमच्या गणपतीची आरती करून मग आम्ही इतर घरात आरती व भजनासाठी जात असू. त्या दिवशी आमच्या वाडीतले सगळ्यात शेवटच्या घरात गणपती निम्मित भजन होते..गौरी आलेल्या होत्या, त्या निम्मिताने ते होते बहुदा ... त्या वर्षी पाउस हि चालू असायचा मध्ये मध्ये ... सगळीकडे ओले ओले हिरवेगार वातावरण (पहा माझा video सखिये ;) ) संध्याकाळी ६/७ च्या सुमारास मी त्या घराच्या अंगणात पोहचलो ... पाउस नुकताच पडून गेलेला होता... सगळीकडे रिप रिप होती ....मी अंगणात टाकलेल्या दगडांवरून पाणी चुकवत घरात शिरत होतो. घराच्या उंबर्या जवळ आलो... आता एक पाय दाराच्या आत असलेल्या ओलसर जमिनीवरच्या पायपुसण्यावर आणि दुसरा पाय दाराच्या बाहेर अंगणात असलेल्या दगडावर (चिरा म्हणतात त्याला कोकणात) असा होता. मी मागचा पाय उचलणार तोच माझा तोल गेला आणि मी ओलसर पाय पुसण्या वरून घसरलो आणि पडलो ... हे सगळा इतका पटकन झाला कि उभा असलेलो मी कधी दारात आडवा झालो हे मला अजूनही कळलेलं नाही...आणि खाली पडताना मी जास्त लागू नये म्हणून दोन्ही हातानी दरवाजाच्या चौकटीला दाबून धरला आणि त्या वजनाने माझा डाव्या हातावर pressure आला आणि हाताने निषेध म्हणून आपली जागा खांद्यातून सोडली .... आपण पडलोय ..बर्यापैकी सावरलोय , थोडे कपडे खराब झालेत पण ते चालायचंच ....असं म्हणून मी समोर बसलेल्या माझ्या समस्त काका वर्गाला "मी बरा आहे ...जास्त नाही लागलेलं " अस म्हणायला सुरुवात केली तेंव्हा मला कळले कि आपण डावा हात खांद्यापासून हलवू शकत नाही आहोत. हलवला कि १०० सुया टोचाव्यात तसं टोचतंय...मग कळालं कि डाव्या हाताची बोटे पण नुसती हलवली तरी खांद्यातून वेदना सरळ डोक्यात घुस्तेय....तेंव्हा जमलेल्या प्रेक्षक वर्गाने जाहीर केला कि माझा हात  डीसलोकेट झालेला आहे......बोला विठठल SSS ..विठठल SSS पुंडलिक वरदा....

अजून एक भयानक गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी पहिली ती खांद्याजवळ हाडाचे टोक वर आलेले दिसत होते म्हणजे normally तिथे सपाट जागा असते तिथे एक टोक वर आलं होतं ...क्षण भर डोळ्यासमोर पांढरा अंधार पसरला...मग पाणी प्यालो. बर्र वाटलं ...आता पुढे कायम्हणून विचारलं तर माझ्या काकांनी मला आमचे एक आजोबा आहेत गावाला (शांताराम अप्पा नावाने त्यांना अख्खा गाव ओळखतो ) त्यांच्याकडे नेण्याची घाई चालवली होती ..ते असल्या गोष्टींसाठी मोठे अनुभवी म्हणून प्रसिद्ध होते ....अजून हि आहेत ....त्यांनी मला समोर बसवलं .... घरातल्या सगळ्यांनी यथेछ चौकश्या केलेल्याच होत्या... मजेची गोष्ट म्हणजे त्या आजोबांनी मला काहीही  विचारला नाही...माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि खांद्याकडे बघत, हाताने चाचपत म्हणाले "अच्छा असं आहे तर ... डॉक्टर तरी काय करणार आहे...आपण बघू अस म्हणून त्यांनी थंड पाणी मागवलं, मला वाटलं माझ्यासाठीच मागवताहेत :) मी त्यांना म्हणालो "अहो मला पाणी नको मी प्यायलोय" तरम्हणतात कसे ...अरे नंतर पण पिशील रे ...अस म्हणून आणलेले थोडे  पाणी सरळ माझ्या डोक्यावर ओतले ...डोकं थंड झालं...त्यांनी हळूच त्यांचा एक हात माझ्या काखेत घातला आणि एका हाताने मनगट पकडलं .... काखेत हात लागल्याने मला ठणका लागला....आजू बाजूची माणसे आत्ता याचं कसं होणार ? अश्या नजरेने बघत होती...मग त्यांनी हळू हळू हात आपल्या हातात घेतला आणि पकड घट्ट  केली...मग हळू हळू तो दुखरा हात जागेवरच वर करू लागले....ब्रम्हांड आठवलं ...डोक्यापासून पाया पर्यंत एकच वेदना पळू लागली...हात वर करत करत त्यांनी जोरात असला ओढला 
कि खांद्यात कुठून तरी हललेला माझा हात परत त्या पोकळीत जाऊन बसला ....बसताना त्याने "टकक " असा आवाज हि काढला आणि शेवटची जीवघेणी वेदना परत माझ्या डोक्यात गेली... मग त्यांनी आधीच आणलेलं पाणी पिण्याशिवाय गत्यंतर नव्हतं 
... ते पाणी प्यायलो (तेंव्हा कळलं ते पाणी त्यांनी का मागवून ठेवल होतं.) आणि इतका बरं वाटायला लागलं ...वा ... खांद्यात थोड्या वेदना होत्या पण त्या सहन करण्या इतक्या होत्या..... मुरगळल्यावर जसं होतं तसं वाटत होतं ....मी खुश झालो चला संकट टळलं  ....मी आजोबांच्या पाया पडून आभार मानून घरी जायला निघालो ...आलो तेंव्हा काकांचा आधार घेऊन आलो होतो....जाताना एकदम काहीच न झाल्यासारखा वाटत होतं ...त्या आनंदात आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट मी ऐकलीच नाही .... "आता जास्त हात हलवू नको रे....हाताला विश्रांती दे... हे त्यांचे शब्द मी ऐकलेच नाहीत."

घरी आलो आई, बाबा, काका आणि समस्त काक्यांनी चौकश्या करून माहिती करून घेतली .... मी वाघ मारून यावा तसा सगळा वृतांत त्यांना सांगितला (तेंव्हा मला कुठे माहित होतं ..परत वाघ मारावा लागणार आहे ते )
आईने गरम पाणी करून हात शेकायला घेतला ...शेकाशेकी झाली ओले अंग पुसण्यासाठी मी टॉवेल घेतला..पाठ पुसता पुसता हाताची जी काय अवस्था होते तशी झाली आणि परत डाव्या हातात काहीतरी झाल....परत त्याच वेदनेचा स्फोट !!!! बापरे परत एकदा 
हात निसटला ....खरच वाटेना !!! पण होतं .... डावा हात मरणाचा दुखत होता...परत आजोबांच्या घरी माझा चुलत भाऊ ऋषी निरोप घेऊन गेला तेंव्हा कळले कि आजोबा नेहमीप्रमाणे तिठ्यावर (एसटी स्टयांड वर )गेलेत ...मग ऋषी त्यांना गाठायला पळाला.
इकडे घरी हलकल्लोळ माजला होता वेदनेचा... यावेळी जास्तच दुखू लागलं होतं ....एका जागेवर बसवेना कि चालता पण येईना .....मग सुमारे १५ मिनिटे वाट बघितल्यावर आजोबा पुन्हा आले ...पुन्हा पाण्याचा ग्लास आला...पुन्हा हात काखे खाली ...पुन्हा टक्क आवाज आणि हुशः आराम!

त्यावेळी सगळ्यात आनंदाची सुखाची चैनीची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हात परत जागेवर आला ती आणि वेदना थांबली ती.... अशा रीतीने माझा हात एका दिवशीच २ वेळा निसटला.

तिसर्यांदा पुन्हा निसटला त्याची गोष्ट:
पहिला हाताच्या गोष्टीला आता सुमारे १ वर्ष होत आलं होतं ... ऑफिस त्यावेळी अंधेरी वेस्ट ला होतं ....ट्रेन ने घरी जायची चांगली सवय मला होती (आता रिक्षाची लागलीय) त्यावेळी १ नंबर वरून रात्री ८.२८ मिनिटाची गाडी विरार करता सुटत असे गर्दी पण जास्त नसे तेंव्हा मी ती पकडायचो त्या दिवशी ती २ नंबर वर आली रिकामी ट्रेन होती मी चढलो पण का कुणास ठाऊक मी जास्त आत न जाता चढलो तिथेच थांबलो दोन्ही हात पूर्ण वर करून मी ह्यांडल पकडले होते. आणि माझ्या मागून विरार वासियांचा लोंढा ट्रेन मध्ये घुसू लागला....आवरता आवरेना ... मी हाताने घट्ट पकडून ठेवला तरी माझं पूर्ण शरीर त्या लोंढ्या बरोबर पुढे जायला लागला होतं ...माझा हात मी अजून घट्ट धरून ठेवला होता वरच्या ह्यांडल ना ....आणि ...आणि ....डाव्या हातातून परत एकदा वीज चमकून गेली ... एका क्षणात मला पुढची चित्र दिसायला लागली .... मी उजव्या हाताने डावा हात धरून तोंड वेडं वाकडं करून 
दात ओठ खात ओरडत होतो ....अर्रे हात डीसलोकेट हो गाय है मेरा....धक्का मत दो .... विरार ट्रेन होती ती ...गर्दी म्हणजे तिचा प्राण
.....तरी हि काही लोकांनी मला दरवाजा जवळ उभा राहायला सांगितलं ...काही लोकांनी धीर दिला ....मी जीव मुठीत धरून केलेला तो प्रवास अजून हि मला आठवतोय ...मला मीरा रोड ला उतरायचं होतं वडिलांना सांगितलं होतं परत एकदा हाताने हात दाखवलाय म्हणून....  एक एक स्टेशन येत होत...गर्दी अंगावर चाल करून येत होती...मी प्रत्येक वेळी ओरडत होतो ....अर्रे संभालो यार्र ...हात डीसलोकेट हो गया हय !!!! ज्यांना कळत होतं ते लोकं चुकचुकत होते .... आणि शेवटी एकदाचं मीरा रोड आलं ... आयुष्यात पहिल्यांदा मला मिरा रोड स्टेशन आल्याचा आनंद झाला असेल ..... एका सहृदय मुलाने माझी ब्याग घेतली तोही उतरला .... मग मी आणि माझे बाबा रिक्षातून हॉस्पिटल मध्ये गेलो तिथे रीतसर x रे...झाले ....इथे आजोबा न्हवते ...पाण्याचा ग्लास नव्हता ...होता एक रुक्ष डॉक्टर ...त्याने परत "टक्क"  आवाज काढून दाखवला ....मी परत हाताला १५ दिवस ब्यांडेज बांधायचा सल्ला घेऊन... बिल चुकवून घरी पोहचलो अशा रीतीने तिसर्यादा हात मोडला त्याची कहाणी समाप्त ....बोला विठठल SSS ..विठठल SSS पुंडलिक वरदा....

चौथ्यांदा पुन्हा निसटला त्याची थोडक्यात गोष्ट: 
थोडक्यात कारण मला माहित्ये तुम्ही हि कंटाळलायत आणि तुमच्या पेक्षा मीही...

हि गोष्ट पण तशी साधीच घरी मी माझी बायको आणि लहान किन्नरी (आई बाबा कार्तिकी एकादशी निम्मित पंढरपूर ला )....रात्रीचे जेवून गप्पा मारत होतो...मी बेड वर बसलेलो होतो ...तो हळू हळू सवयी प्रमाणे झोपता झालो आणि काय सुचलं कुणास ठाऊक मी दोन्ही पाय वर केले आणि शरीर पूर्ण दोन्ही हातावर तोलून धरलं ...फक्त छाती आणि डोकं बेड वर बाकी पूर्ण शरीर वर :) ... हे केलं आणि हळु हळु खाली आलो आणि एका कडेने उठायला गेलो तर...डाव्या हातात वीज...पुढची हॉस्पिटल ला जाई पर्यंतची सर्व दृश्य तुम्ही ...आपण video फोरवर्ड करतो तशी नजरेसमोर आणा .... शेवटी स्लो मोशन मध्ये डॉक्टर चा हात हातात आणि "टक्क" आवाज ... १३०० रु बिल ...हाताला २० दिवस ब्यांडेज बांधायचा सल्ला... अशा रीतीने  चौथ्यांदा  हात मोडला त्याची कहाणी समाप्त ....बोला विठठल SSS ..विठठल SSS पुंडलिक वरदा....

(पण या वेळी तो जो टक्क आवाज आला तो फार लहान होता आणि वेदना पण कमी होती :) )

२ टिप्पण्या:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

परमनंट इलाज करुन घे. नट-बोल्ट बसवून डिसलोकेट होणारच नाही असं काही तरी ;)

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

परमनंट इलाज करुन घे. नट-बोल्ट बसवून डिसलोकेट होणारच नाही असं काही तरी ;)